आरेमध्ये 70 झाडांचा बळी देऊन 32 मजली ‘मेट्रो भवन’चे काम सुरू

719

मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल केली गेली. आता तिथेच ‘मेट्रो भवन’चेही काम सुरू करण्यात आले आहे. या 32 मजली प्रस्तावित मेट्रो भवनसाठी सुमारे 70 झाडांचा बळी दिला गेला असून या भवनामुळे आरेतील पर्यावरणाला धोका होऊ शकतो असा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी दुग्धविकास विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) परवानगी दिली असून या इमारतीच्या सीमेबाहेरील निसर्गाला काहीच धक्का लागणार नाही असा दावाही केला आहे.

मुंबईतील 337 किलोमीटरच्या 14 मेट्रो मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे मेट्रो भवन मुख्यालय उभारले जाणार आहे. या मेट्रो भवनसाठी आरेमध्ये 2.03 हेक्टरचा भूखंड राखीव ठेवला गेला होता. त्यावर काम सुरू करण्याची परवानगी गेल्या 11 ऑक्टोबरला दुग्धविकास विभागाने दिल्याची माहिती आहे. हा भूखंड संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. तरीसुद्धा आता तिथे मेट्रो भवनसाठी सॉईल टेस्टिंगचे काम सुरू झाले आहे.

मेट्रो भवन ज्या भूखंडावर उभारले जाणार आहे तो पूर्वी अविकसित क्षेत्रामध्ये मोडत होता, परंतु ऑगस्ट महिन्यातच नगरविकास विभागाने परिपत्रक काढून त्यात बदल केला. त्यावर मेट्रो भवन उभारणीसाठी परवानगी दिली गेली. तसेच कायमस्वरूपी रिसर्व्हिसिंग सेंटर, तात्पुरती कामगार वसाहत आणि स्टील मशिनरी यार्डही त्या भूखंडावर असणार आहे.

संपूर्ण आरे नष्ट करण्याचाच हा डाव

मेट्रो भवन ज्या भूखंडावर उभारण्याची एमएमआरडीएची योजना आहे ते क्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येते. तिथे काहीही करायचे झाले तर पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक आहे. ती न घेताच तिथे बांधकामाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खरंतर हा संपूर्ण आरे नष्ट करण्याचाच डाव म्हणावा लागेल. – झोरू बथेना,पर्यावरण कार्यकर्ते

आपली प्रतिक्रिया द्या