
मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे विणण्याचे काम विविध ठिकाणी सुरू असून मुंबईत बंगळूरू येथून आणलेल्या ‘मॉक’ कोचला विविध अधिकारी भेट देत आहेत. मुंबई भेटीवर आलेल्या केंद्र सरकारमधील सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी मेट्रोच्या एमएमआरडीएच्या बीकेसी येथील प्रदर्शनार्थ ठेवलेल्या मेट्रोच्या प्रारूप कोचला भेट देऊन मेट्रोच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मुंबईमध्ये मेट्रोच्या सुरू असलेल्या विविध मार्गांसाठीचा मेट्रोचा एक मॉक कोच बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदानात प्रदर्शनासाठी ठेवला आहे. या कोचला मुंबई भेटीवर आलेल्या केंद्र सरकारचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी भेट देऊन कोचची पाहणी केली. याप्रसंगी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पेरेशनच्या संचालिका अश्विनी भिडे, महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डी. के. शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी मिश्रा यांनी मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकारी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले.
दाटल्या त्या कटू आठवणी…
मध्य रेल्वेचे परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचे प्रभादेवी (एलफिन्स्टन) स्टेशन यांना जोडणार्या पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली. या घटनेच्या कटू आठवणी या प्रवाशांचे कुटुंबीय, मित्रमंडळी अद्यापही विसरलेले नाहीत. या दुर्घटनेत बळी पडलेल्या 28 वर्षीय चंदन सिंग या तरुणाच्या आई वडीलांनी आज घटनास्थळी चंदनला श्रद्धांजली वाहिली तर मीना वाल्हेकर हिच्या मित्रांनीही तिला श्रद्धांजली देणारे फलक लावले होते.



























































