गेल्या काही दिवसांपासून एका एलियनच्या मृतदेहावरून जगभरात भलत्याच चर्चा झडत होत्या. एका विचित्र दिसणाऱ्या ममीवरून या चर्चा सुरू झाल्या होत्या. खरोखर एलियन म्हणजेच परग्रहवासी अस्तित्वात आहेत का, या गेल्या अनेक वर्षांपासून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाने पुन्हा डोकं वर काढलं होतं. त्यावर आता एक वेगळाच दावा समोर येत आहे.
मेक्सिकोच्या संसदेत एका यूएफओ तज्ज्ञाने काही दिवसांपूर्वी एलियनचा मृतदेह दाखवला होता. त्यानंतर अवघ्या जगात त्याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. या दरम्यान, आता या एलियनच्या अवशेषांविषयी अजून एक खुलासा झाला आहे. एलियनच्या अवशेषांचं एक्स रे परीक्षण केल्यानंतर हे अवशेष मानवनिर्मित नसल्याचं उघड झालं आहे.
द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, या एलियनच्या मृतदेहाचं परीक्षण मॅक्सिकोच्या नौसेना विभागाचे संचालक जोस डी. जीझस जल्से बेनिटेज यांनी केलं होतं. त्यांच्या परीक्षणानंतर काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. एलियनचा मृतदेह हा कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेला नसून त्याच्या मृतदेहाशी छेडछाडही झालेली नाही. ते एकाच सांगाड्याचे भाग आहेत, असं बेनिटेजने स्पष्ट केलं आहे. कारण, यापूर्वी एलियनचा मृतदेह कृत्रिम रुपाने तयार केल्याचा दावा काहींनी केला होता. तर काहींच्या म्हणण्यानुसार, हे मृतदेह ममी स्वरुपातील मानवाचे प्राचीन अवशेष आहेत.
स्वयंघोषित एलियन तज्ज्ञ असलेल्या जॅमे मॉसन यांनी गेल्या आठवड्यात हे मृतदेह पेरू येथील कुज्को येथील एका खाणीतून सापडल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या दाव्यानुसार, हे मृतदेह 1 हजार वर्षं जुने आहेत. या तथाकथित एलियनचा मृतदेह हा छोटा आणि तीन बोटांचा होता. त्यांना कवटीही होती. या एलियनचे डीएनए हे कोणत्याही मानवी डीएनएशी जुळत नाहीत. या मृतदेहांची मॅक्सिकोच्या एका विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तपासणी केली. रेडियोकार्बन डेटिंग प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी या मृतदेहातील डीएनए शोधून काढले. त्यातील 30 टक्के डीएनए हे अज्ञात असून या मृतदेहातील एका मादीच्या पोटात अंडी आढळल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे.