हिंदुस्थानच्या ऍडलीनने ताज नव्हे, मन जिंकले! मेक्सिकोची अँड्रिया मेझा बनली ‘मिस युनिव्हर्स’

मेक्सिकोची अॅंड्रिया मेझा ’मिस युनिव्हर्स’ 2020 ची विजेती ठरली. 69 व्या स्पर्धेची अंतिम फेरी फ्लोरिडा येथे पार पडली. ब्राझीलची ज्युलिया गामा ही फर्स्ट रनरअप तर पेरुची जॅनिक मॅसेटा सेकंड रनरअप ठरली. स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारी अॅडलीन कॅस्टेलिनो हिने चौथा क्रमांक (थर्ड रनरअप) पटकावला. हिंदुस्थानच्या सौंदर्यवतीला मुकुटाने हुलकावणी दिली असली तरी तिच्या उत्तराने सर्वांचे मन जिंकून घेतले.

अंतिम फेरीत अॅडलीनला प्रश्नोत्तराच्या सत्रात लॉकडाऊनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने खूप संतुलित उत्तर दिले. अनेक देशांनी लॉकडाऊन केले. लॉकडाऊनचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो, मग देशात लॉकडाऊन केलं पाहिजे की सर्व सुरू ठेवलं पाहिजे, असा प्रश्न ज्युरी सदस्यांनी अॅडलीनला विचारला. त्यावर उत्तर देताना, अॅडलीन म्हणाली, मी हिंदुस्थानातून आलेय. माझा देश सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे, त्यातून मला एक महत्त्वाची जाणीव झालेय. ती म्हणजे आपल्या माणसांच्या आरोग्यापेक्षा दुसरं मोठं काही नाही. त्याचबरोबर अर्थव्यवस्था आणि आरोग्य यांची सांगड घातली पाहिजे. असं तेव्हाच साध्य होईल जेव्हा सरकार लोकांच्या हातात हात घालून चालेल आणि असं काही करेल की अर्थव्यवस्थेलाही मदत होईल.

अॅडलीनच्या उत्तरावर ज्युरीसह उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. याबद्दल सोशल मीडियावरही तिचे कौतुक होत आहे. स्पर्धेत म्यानम्यारचे प्रतिनिधित्व करणाऱया थूजर विंट ल्विन हिने मिस युनिव्हर्सच्या मंचावरून देशातील लष्करी बंडाविरोधात जगाचे लक्ष वेधले. थूजर म्हणाली, आमचे लोक मरत आहेत. लष्कराविरोधात जो कुणी बोलेल, त्याला मारले जातेय. प्रत्येक दिवशी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. म्हणूनच मी म्यानमारसाठी आवाज उठवत आहे.

तोतरेपणा, शरीरावर डाग

अॅडलीनचा जन्म कुवैत येथील असून ती वयाच्या 15 व्या वर्षी हिंदुस्थानात आली आणि मुंबईत राहू लागली. अॅडलीनच्या कुटुंबाची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असून ते कर्नाटकातील उदयवारा येथील आहेत. कुवैतमध्ये लहानाची मोठी होत असताना अॅडलीनला फक्त एकच ध्यास होता, तो म्हणजे सौंदर्य स्पर्धेचा. कुवैतमध्ये तशी संधी नव्हती, म्हणून ती हिंदुस्थानात आली. मिस युनिव्हर्सचा ताज तिला खुणावत होता. पण तिच्या मार्गात अनेक अडचणी होत्या. तिच्या शरीरावर डाग होते. तिला धड बोलताही येत नव्हतं. अॅडलीन सांगते, माझ्यासारख्या मुलीला जिला चांगलं बोलता येत नाही, जिच्या शरीरावर डाग आहेत, तिला या प्रतिष्ठच्या टप्प्यावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, असा विचारही मी कधी केला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या