सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न लांबणीवर, आचारसंहितेचा म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेला फटका

म्हाडाच्या प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या योजनेतील मुंबईतील सव्वाशे घरांच्या जाहिरातीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, महापालिका निवडणुकांसाठी सोमवारपासून जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे या घरांच्या विक्रीची जाहिरात आता लांबणीवर पडली आहे. त्यामुळे इच्छुक अर्जदारांना आता फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

दोन वेळा सोडतीत समावेश करूनही विविध कारणात्सव म्हाडाची अनेक घरे विक्रीविना पडून आहेत. या घरांच्या मेंटेनन्स आणि सुरक्षेवर म्हाडाच्या तिजोरीतील दरमहा लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे विक्रीविना धूळखात पडलेल्या ताडदेव, जुहू, पवई, ऍण्टॉप हिल, लोअर परळ, शिंपोली येथील सुमारे सव्वाशे घरांची प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विक्री करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला होता. याच महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करून म्हाडाच्या ‘बुक माय होम’ या संकेतस्थळावर घरांची विक्री करण्याचे म्हाडाचे नियोजन होते. मात्र आता या घरांच्या विक्रीची जाहिरात आचारसंहितेनंतरच प्रसिद्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.