मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या घरांच्या किंमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या असून 62 लाखांचे घर 50 लाखांत, तर 39 लाखांचे घर 29 लाखांत मिळणार आहे. म्हाडाने 2030 घरांची लॉटरी जाहीर केली होती; परंतु घरांच्या किंमती पाहून अनेकांनी याकडे पाठ फिरवली होती. आता म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील घरांच्या किंमती तब्बल 10 ते 12 लाखांनी कमी केल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई मंडळ सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीसाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, घरांच्या सुधारित किंमती लवकरच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच प्रसिद्धीपत्रकांद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.
आज म्हाडाच्या श्री आणि श्रीमती निवासी शुभंकर चिन्हाचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना घरांच्या किमतीत घट करण्यात आल्याचे सांगितले. पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून विकासकांकडून म्हाडाला गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या 370 सदनिका संगणकीय सोडत प्रणालीतून विक्रीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातील अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 25 टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 15 टक्क्यांनी तर उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. यावेळी म्हाडाच्या नूतन शुभंकरचे म्हाडा परिवारात स्वागत करण्यात आले. हे शुभंकर म्हणजे म्हाडासाठी शुभेच्छादूतांची भूमिका बजावणार आहेत. म्हाडा हे लोकाभिमुख कार्यालय असल्याने अनेक नागरिक मार्गदर्शनासाठी म्हाडा कार्यालयाला भेट देतात. अशावेळी म्हाडाच्या कार्यप्रणालीची ओळख आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी नागरिकांना श्री आणि श्रीमती निवासी यांच्याद्वारे शुभंकरची मदत होणार असल्याचे सावे यांनी सांगितले. यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी उपस्थित होते.
शुभंकर आणि निवासी म्हाडा दांपत्य नवी ओळख
म्हाडाचे शुभंकर श्री आणि श्रीमती निवासी हे दांपत्य म्हाडाच्या नवीन ओळखीचे प्रतीक असून ते प्रत्येक नागरिकांच्या घराच्या स्वप्नांना दिशा देतात. हे शुभंकर म्हाडाच्या योजनेबाबत मार्गदर्शन करतील. नागरिकांना त्यांच्या घरासंबंधित समस्यांवर मैत्रीपूर्ण संवादाद्वारे सल्ला देतील. एक विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून नागरिकांच्या सोबतीने पुढे जातील. त्यांच्या उपस्थितीमुळे म्हाडाच्या योजनांची आणि सेवांची माहिती नागरिकांना अधिक सुलभतेने उपलब्ध होईल, असा विश्वास म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.