म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी लुडकली, अ‍ॅपमध्ये बिघाड; अर्जदारांमध्ये संताप

मोठा गाजावाजा करत म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली असून अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीला शुक्रवारपासून सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी अर्ज नोंदणी लुडकली. अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे अर्ज सादर करण्यास अर्जदारांना मोठी कसरत करावी लागतेय. वारंवार अॅप अपडेट करण्यासंबंधी मेसेज येत असल्याने अर्जदारांकडून संताप व्यक्त होतोय.

म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता अर्जदारांना Mhada Housing Lottery System या नावे मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरदेखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हाडाने लाखो रुपये खर्च करून अॅपची निर्मिती केली, मात्र ऐन नोंदणी काळातच अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.

अर्जदारांना अॅपवरून अर्ज करताना वारंवार अपडेटचे मेसेज येत आहेत. वास्तविक अपडेट बटणावर क्लिक केल्यावर अॅप अपडेट होणे अपेक्षित आहे, मात्र अपडेट बटणावर क्लिक करताच ओपन ऑप्शन येते आणि ओपन ऑप्शनवर क्लिक केल्यावर पुन्हा अपडेटचा मेसेज दाखवला जातो. त्यामुळे अर्जदार संभ्रमात आहेत.

आतापर्यंत केवळ 658 अर्ज
शुक्रवारी दुपारनंतर अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीला सुरुवात झाली असून शनिवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत केवळ 658 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 393 जणांनी अनामत रकमेसह अर्ज भरले आहेत. आचारसंहितेपूर्वी सोडत काढण्याची घाई म्हाडाने केल्यामुळे इच्छुकांना अर्ज आणि पैसे भरण्यासाठी जेमतेम 26 दिवस मिळत आहेत. त्यात अॅपमधील बिघाडाचा फटकादेखील अर्जदारांना बसतोय.