म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा थंड प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांत 1301 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 424 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत, अशी माहिती म्हाडाच्या वतीने देण्यात आली.
नुकत्याच मुंबईतील पार पाडलेल्या सोडतीनंतर 11 ऑक्टोबरला म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 12,626 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. ही सोडत दोन भागांत विभागली आहे. यात 12,626 घरांपैकी 11,187 घरे ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत, तर 1439 घरे लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहेत. 1439 घरांमध्ये 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 594 घरे, मागील सोडतीतील व इतर विखुरलेली 607 घरे आणि 117 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच 121 घरे पत्रकार प्रवर्गाकरिता आरक्षित आहेत. लॉटरीच्या माध्यमातून विकण्यात येणाऱया या घरांसाठी आठ दिवसांत केवळ 1301 अर्ज प्राप्त झाले आहेत. या सोडतीसाठी इच्छुक अर्जदार 10 डिसेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकतात, तर 11 डिसेंबरला रात्री 11.59 पर्यंत अनामत रक्कम भरु शकतात. अर्ज भरण्यास बराच कालावधी असल्यामुळे या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशा विश्वास कोकण मंडळाने व्यक्त केला आहे.
‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ घरांसाठी 3400 अर्ज
कोकण मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत 11,187 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 9883 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर योजनेअंतर्गत 512 घरे, 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 661 घरे तसेच विखुरलेली 131 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ‘प्रथम येणाऱया प्रथम प्राधान्य’ या गटासाठी सुमारे 3400 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी जवळपास दोन हजार जणांनी अनामत रक्कमदेखील भरली आहे.