म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. म्हाडातर्फे मुंबईतील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. गोरेगाव, मालाड, जुहू, अॅण्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर, ताडदेव अशा विविध ठिकाणी असलेल्या या घरांच्या किमती 30 लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. या घरांच्या विक्रीतून तब्बल 2100 कोटी रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा होणार आहेत. इच्छुक 9 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी करू शकतात, तर घरांची संगणकीय सोडत ऐन गणेशोत्सवात म्हणजेच 13 सप्टेंबरला पार पडणार आहे.
खासगी विकासकांच्या घराच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक जण म्हाडाच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहतात. अखेर सर्वसामान्यांची प्रतीक्षा आता संपली असून म्हाडाने सोडतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी 9 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून 4 सप्टेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत करता येईल. ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती 4 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत केली जाणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 9 सप्टेंबरला, तर स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 11 सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाईल. संगणकीय सोडत 13 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता काढण्यात येईल.
सर्वसामान्यांसाठी कमी घरे
यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी सर्वात कमी घरे असल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768, तर उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय म्हाडाने बांधलेली 1327, पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या 370 तसेच मागील सोडतीतील विखुरलेल्या 333 घरांचादेखील समावेश आहे.
असा करा अर्ज
सोडतीत सहभागी होण्याकरिता Mhada Housing Lottery System या नावे मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अर्जदार https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या संकेतस्थळावरदेखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अत्यल्प उत्पन्न गटासाठी सहा लाखांपर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी नऊ लाखांपर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी बारा लाखांपर्यंत, तर उच्च उत्पन्न गटासाठी बारा लाखांहून अधिक आहे.
अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
अल्प उत्पन्न गटाचे घर दीड कोटीपर्यंत
मिळालेल्या माहितीनुसार, अत्यल्प उत्पन्न गटातील घराच्या किमती अंदाजे 30 ते 40 लाख, तर अल्प उत्पन्न गटातील घराच्या किमती अंदाजे 50 लाख ते दीड कोटीपर्यंत असणार आहे. दरम्यान, हाऊसिंग स्टॉकच्या माध्यमातून मिळालेली काही घरे दक्षिण मुंबईत असल्याने या घरांच्या किमती कोटय़वधीमध्ये आहेत. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला दीड कोटींचे घर कसे परवडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तर पंतप्रधान आवास योजनतील घरांच्या किमती 32.36 लाख असून गेल्यावेळच्या लॉटरीपेक्षा दोन लाखांनी महागले आहेत. मध्यम उत्पन्न गटातील घराच्या किमती अंदाजे 75 लाख ते 2 कोटीपर्यंत, तर उच्च उत्पन्न गटातील घराच्या किमती अंदाजे सवा कोटी ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत.