
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या नोकरदार महिलांसाठी ताडदेव येथे अद्ययावत वसतिगृह उभारणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळताच कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी म्हाडाने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून यासाठी तब्बल 83 कोटी रुपये म्हाडा आपल्या तिजोरीतून खर्च करणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कामानिमित्त अनेक महिला एकटय़ा राहतात. या महिलांना भाडय़ाने घरे शोधण्यासाठी वणवण करावी लागते. अशा नोकरदार महिलांची गैरसोय होऊ नये याकरिता म्हाडा आता ताडदेव एम.पी. मिल कंपाऊंड येथे अद्ययावत वसतिगृहाची उभारणी करणार आहे. 23 मजल्यांचे हे वसतिगृह असणार आहे. यात प्रत्येकी 300 चौरस फुटांच्या 196 सदनिका उभारण्यात येणार आहेत. एका सदनिकेत दोन याप्रमाणे 392 नोकरदार महिलांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. पुढील तीन ते चार वर्षांत या वसतिगृहाचे काम पूर्ण होणार आहे. वसतिगृहात राहणाऱ्या महिलांकडून म्हाडा दरमहा भाडे आकारणार आहे; परंतु भाडे किती असणार, मेंटेनन्स, लाईट बिल कोण भरणार याबद्दल अद्याप काही ठरलेले नाही.
सुसज्ज मेस, सलून, लॉण्ड्री
वसतिगृहात राहणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी या इमारतीतच एटीएम, दवाखाना, मेडिकल, सलून, लॉण्ड्री, योगा, स्विमिंग पूल, मेस यांसारख्या सुविधादेखील देण्यात येणार आहेत.




























































