
मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील म्हाडाची 120 घरे ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर गुरुवार, 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. थेट लॉटरीशिवाय घर घेण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. गायकवाड नगर, मालवणी येथील घराची किंमत 31 लाख रुपये असून सर्वात महागडे 8 कोटी रुपयांचे घर ताडदेव क्रिसेंट टॉवर येथे आहे.
सोडतीत दोन वेळा समावेश करूनही विक्री न झालेल्या घरांची ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे. इच्छुक नागरिकांना https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करावी लागणार आहे.
या योजनेत शिंपोली कांदिवली येथील 8, चारकोप सेक्टर-8 येथील 2, अँटॉप हिल-वडाळा येथील 27, तुंगा पवई येथील 44, पीएमजीपी मानखुर्द येथील 1, मालवणी मालाड येथील 1, गायकवाड नगर मालवणी येथील 1 याशिवाय घाटकोपर पूर्व 2, कन्नमवार नगर 1, अँटॉप हिल 8, भायखळा 6, ताडदेवमधील 6, लोअर परळमधील 4, शीव 2 सदनिका, जेव्हीपीडी अंधेरीतील 7 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
48 तासांत दहा टक्के रक्कम भरावी लागणार
अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होमसाठी बटन दिसेल. त्यावर विंग/इमारत क्रमांक, घराचा क्रमांक, मजला याची माहिती उपलब्ध असेल. अर्जदार त्यांना हवे असणारे घर निवडू शकतात. घराची निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत घराच्या विक्री किमतीच्या दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे. रकमेचा भरणा केल्यानंतर तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल. पुढील 90 दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे.




























































