म्हाडाच्या घरांसाठी अर्जदारांचा पाऊस, 5,285 घरांसाठी तब्बल एक लाख अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. ठाणे, वसई, कल्याण, नवी मुंबईतील 5,285 घरांसाठी आतापर्यंत तब्बल एक लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी अजूनही नऊ दिवस शिल्लक असल्याने अर्जदारांची संख्येत आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच मुंबई मंडळाच्या तोडीचे अर्ज कोकण मंडळांच्या घरांसाठी प्राप्त झाले आहेत.

कोकण मंडळाच्या या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली 1677 घरे तसेच 50 टक्के योजनेअंतर्गत 41 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, नवी मुंबई अशा विविध लोकेशनवर ही घरे असून 9.50 लाखांपासून ते 85 लाखापर्यंतच्या घरांच्या किमती आहेत. मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत 1लाख 579 जणांनी अर्ज भरले असून 67 हजार 648 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.

शेवटचे नऊ दिवस बाकी 

घरांसाठी इच्छुक अर्जदार 28 ऑगस्ट रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत  ’म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात तर 29 ऑगस्ट रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. अनामत रकमेसह प्राप्त अर्जाची सोडत 18 सप्टेंबर रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.