राज्यभरातील अकरा हजारांहून अधिक घरे धूळखात पडल्यामुळे म्हाडाला आता उशिरा शहाणपण सुचले आहे. मुंबई, कोकण वगळता म्हाडाच्या अन्य मंडळांच्या घरांना कमी मागणी असते. या पार्श्वभूमीवर आधी बुकिंग करून मगच घरे बांधण्याचा निर्णय म्हाडा घेणार आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी उपाध्यक्षांकडे पाठवण्यात येणार आहे.
म्हाडाची राज्यभरात तब्बल 11 हजार 193 घरे धूळखात पडली आहे. यातील 4 हजारांहून अधिक घरे एकट्या विरार बोळींज येथे आहेत. या घरांमुळे म्हाडाचा 3100 कोटी रुपयांचा निधी अडकून पडला आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडा आता सावधपणे पावले उचलताना दिसत आहे. एमएमआर वगळता ज्या भागात घरे विकली जातील की नाही याबाबत म्हाडाला शंका आहे अशा ठिकाणी अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम म्हणजेच आगाऊ बुकिंग करून मगच घरे बांधण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत म्हाडा आहे.
टप्प्याटप्प्याने पैसे घेणार
खासगी विकासकांप्रकारे म्हाडादेखील इच्छुकांकडून टप्प्याटप्प्याने आगाऊ पैसे घेऊन घरे बांधणार आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी उपाध्यक्षांकडे पाठविला जाईल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.