हिंदुस्थानची मदार कोहली, बुमराहवर; मायकेल होल्डिंग यांचे मत

67
virat-bumrah-rohit-sharma

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय स्तरावर धावांचा पाऊस पाडणारा विराट कोहली व इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या अव्वल देशांतील फलंदाजांची भंबेरी उडवणारा जसप्रीत बुमराह हिंदुस्थानसाठी वर्ल्ड कपमध्ये मोलाची भूमिका बजावेल असे भाकीत केले आहे वेस्ट इंडीजचे माजी महान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

यजमान इंग्लंडसह टीम इंडिया फेव्हरेट
या वर्ल्ड कपसाठी जेतेपदाचा प्रबळ दावेदार कोण असा प्रश्न विचारला असता मायकेल होल्डिंग म्हणाले, यजमान इंग्लंडसह टीम इंडियाला या स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची संधी असेल. इंग्लंडच्या संघाने गेल्या काही महिन्यांत उल्लेखनीय कामगिरी केली असून ते त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहेत. त्यामुळे खेळपट्टय़ा व वातावरण याबाबत त्यांना इतर संघांपेक्षा अधिक माहीत असेल. हिंदुस्थानी संघात एकापेक्षा एक असे चॅम्पियन खेळाडू आहेत. त्यामुळे दोघांपैकी एकाने हा वर्ल्ड कप जिंकल्यास आर्श्च्य वाटणार नाही, असेही ते ठामपणे म्हणाले.

वेस्ट इंडीजबाबत मौन…
वेस्ट इंडीज संघाला अजिंक्यपदाची संधी असेल का याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, वेस्ट इंडीज संघाला एक ते दीड वर्ष खेळताना पाहिलेले नाही. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. तसेच पाकिस्तानी संघासारखा अनिश्चित संघ कोणताही नाही. त्यामुळे त्यांच्याकडूनही चमकदार कामगिरी होऊ शकते. श्रीलंकन संघात सध्या मॅचविनर खेळाडूंची कमतरता आहे, पण वन डे क्रिकेटमध्ये कोणताही संघ चमत्कार करू शकतो हेही विसरता कामा नये, असे
मायकेल होल्डिंग यावेळी म्हणाले.

नव्या फॉरमॅटमुळे सर्वांना समान संधी
या वर्ल्ड कपमध्ये सर्व संघांना जेतेपदाची समान संधी असणार आहे. एखाददुसऱया लढतीत पराभूत झाल्यानंतरही त्यांना उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी असणार आहे. जो संघ दबावाखाली चांगला खेळ करील तोच बाजी मारेल असा विश्वासही मायकेल होल्डिंग यांनी यावेळी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या