घरांच्या टंचाईवर मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉन एकत्र; सरकारला दिला कडक इशारा

तंत्रज्ञान क्षेत्रातील एकमेकांचे कट्टर स्पर्धक मानले जाणारे मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि ॲमेझॉन (Amazon) एका सामाजिक संकटासाठी एकत्र आले आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेटमध्ये निर्माण झालेल्या घरांच्या टंचाईच्या (Housing Crisis) प्रश्नावर या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येत चिंता व्यक्त केली असून सरकारला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ आणि ॲमेझॉनचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी डेव्हिड झापोल्स्की यांनी ‘द सिएटल टाइम्स’मध्ये एक संयुक्त लेख (Op-Ed) लिहून या संकटावर प्रकाश टाकला आहे.

‘घरांचे संकट हे राज्यासाठी धोका’

सिएटल परिसरातील घरांची कमतरता केवळ राहणीमानावरच नाही, तर आरोग्य आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीवरही परिणाम करत असल्याचे या लेखात म्हटले आहे. ‘गेल्या दशकात घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, कामावर जाण्यासाठी प्रवासाचा वेळ वाढला आहे आणि प्रतिभावंतांना (Talent) आकर्षित करण्याची राज्याची क्षमता धोक्यात आली आहे’, असे या दोन्ही दिग्गजांनी नमूद केले.

१.६ अब्ज डॉलर्सची मदत

या संकटाशी लढण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी आतापर्यंत एकत्रितपणे १.६ अब्ज डॉलर्स (सुमारे १३,००० कोटी रुपये) गुंतवले आहेत. या निधीतून २६,००० हून अधिक परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. विशेष म्हणजे, ही घरे केवळ या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नसून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असतील.

लेखानुसार, हे संकट पूर्णपणे पुरवठ्याशी संबंधित (Supply-side problem) आहे. वॉशिंग्टन राज्याला पुढील २० वर्षांत किमान १० लाख नवीन घरांची गरज आहे, म्हणजेच दरवर्षी ५०,००० घरे बांधली जाणे आवश्यक आहे. मात्र, सध्या नवीन बांधकामांच्या परवानग्या मिळण्याचे प्रमाण कमी होत असल्याने हे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारला इशारा

त्यांनी सरकारला अत्यंत कडक शब्दांत सांगीतले आहे की,’जर एखादे धोरण घरेबांधणीची प्रक्रिया अधिक महाग करत असेल किंवा बांधकामास विलंब लावत असेल, तर ते मंजूर करू नका. बँका आणि गुंतवणूकदार अशाच ठिकाणी जातात जिथे त्यांना कामाची शाश्वती मिळते. जर आपण सुधारणा केली नाही, तर इतर राज्ये आपल्या पुढे जातील.’