खरेदीचा बहाणा करून करायचे हातसफाई, उमाबाई सकाळे आणि नीलाबाई सूर्यभान गजाआड

दागिने खरेदीचा बहाणा करून ज्वेलर्सच्या दुकानात हातसफाई करणाऱ्या दोन महिलांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. उमाबाई सकाळे आणि नीलाबाई सूर्यभान अशी त्या दोघींची नावे आहेत. त्या दोघींना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. अंधेरी येथे त्यांच्या मालकीचे एक ज्वेलर्सचे दुकान आहे. एप्रिल महिन्यात ते दुकानात होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास दोन महिला दुकानात आल्या. त्याने लहान मुलाच्या पायातील वाळे आणि कमरेची साखळी दाखवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार याने वाळे आणि साखळी दाखवली. त्याचदरम्यान महिलेने दुकानातील 51 हजार रुपयांचे दागिने चोरी केले. काही वेळानंतर त्या दोघी काही खरेदी न करता निघून गेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक जण त्याच्याकडे आला. त्यानेदेखील लहान मुलाचे दागिने दाखवण्यास सांगितले. तोदेखील दागिने खरेदी न करता निघून गेला.

हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा चोरीचा प्रकार उघड झाला. दागिने चोरीप्रकरणी तक्रारदार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उमाबाई आणि नीलाबाई या दोघींना अटक केली.