हिंदुस्थानने मिग 29 विमाने केली अद्ययावत; चीन-पाकवर देखरेख होणार सुलभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जालंधर

हिंदुस्थानी हवाई दलाने मिग 29 ही लढाऊ विमाने अद्ययावत करून त्यांची गती आणि क्षमता वाढवली आहे. हवाई दलाला लढाऊ विमानांची कमतरता भासू नये, यासाठी मिग विमानांची क्षमता वाढवण्यात आली आहे. या विमानात उड्डाणादरम्यान इंधन भरण्याची सोय़ही करण्यात आली आहे. या विमानाने एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करता येणार आहे. चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठीही या विमानांची महत्वाची भूमिका असेल, अशी माहिती फ्लाइट लेफ्टनंट करन कोहली यांनी दिली.

अदमपूर हवाई दलाच्या तळावर गेल्या आठवड्यात मिग 29 या अद्ययावत विमानांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सोमवारी हवाई दल दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातही ही विमाने सहभागी होणार आहेत. या विमानांमध्ये मल्टीफक्शंनल डिस्प्लेही बसवण्यात आला आहे. हवाई दलाला सध्या भासत असलेली लढाऊ विमानांची कमतरता ही विमाने भरून काढणार आहेत. या विमानांचे हवाई दलात महत्वाचे योगदान आहे. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान मिग 29 विमानांनी पाकिस्तानच्या सैन्याविरोधात चांगली कामगिरी बजावली होती. कारगिल युद्धात अदमपूर हवाई तळाने महत्वाची कामगिरी पार पाडत 15 हजार फूटांच्या उंचीवर शत्रूचे लढाऊ विमान नष्ट केले होते.

अदमपूर हवाईतळ पाकिस्तानपासून 100 किलोमीटर तर चीनपासून 250 किलोमीटरवर आहे. आता या महत्वाच्या हवाई तळावर अद्ययावत मिग विमाने तैनात असणार आहेत. हवाई दलाकडे मिग 29 विमानांचे तीन स्कॉर्डन आहे. त्यातील दोन या तळावर आहेत. एका स्कॉर्डनमध्ये 16 ते 18 विमाने असतात. हिंदुस्थानी हवाई क्षेत्रात शत्रूचे विमान शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात ही विमाने उड्डाण करण्यास सक्षम आहेत. या अद्ययावत विमानांमध्ये सर्व सुविधा आहेत. या विमानांमध्ये हवेत आणि  जमीनीवर  मारा करण्याची क्षमता आहे आणि अँटी शिपिंग कारवाई अधिक जलद गतीने करणे शक्य होणार आहे. या विमानात ग्लास कॉकपीट, डिजिटल स्क्रीन यासारख्या सुविधा आहेत.