मायग्रेनच्या रुग्णांची संख्या वाढली; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बदललेल्या जीनशैलीमुळे मधुमेह, हृदयविकार यासारख्या रोगांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. सातपैकी एकाला अर्धशिशीची व्याधी जडल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. या आजारात डोके गरगरणे, चक्कर येणे, डोक्यावर घण घातले जात आहेत अशा वेदना होणे डोक्याचा अर्धा भाग सतत दुखणे, अस्वस्थ वाटणे असे त्रास होतात. मात्र, अपुरी झोप आणि इतर कारणाने त्रास होत असेल असे समजून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे हा आजार बळावतो असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जगभरातील आरोग्य समस्येबाबत जागृती करण्यासाठी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जागतिक मायग्रेन सप्ताह पाळला जातो. त्यानिमित्ताने संघटनेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात मायग्रेनच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जागितक आरोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरॉलॉजी आणि इंडियन अकॅडमी ऑफ न्युरॉलॉजीच्या सूचनेवरून मायग्रेन सप्ताह पाळण्यात येतो. जगभरात मायग्रेनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जगभरात सुमारे 17 कोटी व्यक्तींना मायग्रेनचा त्रास असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच पुरुषांपेक्षा महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. या आजाराला मेंदूतील काही रासायनिक स्थित्यंतरे कारणीभूत ठरतात. महिलांमध्ये संप्रेरकांचे बदल झपाट्याने होत असतात. त्यामुळे महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.

आपली प्रतिक्रिया द्या