
>> संदीप जाधव
मराठी भाषा दिनाला जेमतेम महिना उरला असतानाच बोईसरमध्ये ‘आपल्याच घरात हाल सोसते मराठी..’ अशी दयनीय स्थिती दिसून आली आहे. गिरनोली ग्रामपंचायत हद्दीतील घरांचे नाव व पत्तेच परप्रांतीय ठेकेदाराने बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरांच्या पाट्यांवर अशुद्ध लेखन केले असून नाव वाचताही येत नाही. आपले स्वतःचेच नाव चुकीच्या पद्धतीने लिहिल्याचे बघून घरमालकांवर पश्चातापाची वेळ आली आहे. मराठी भाषेची झालेली मोडतोड बघून बोईसरवासीयांनी संताप व्यक्त केला आहे.
बोईसर तालुक्यातील गिरनोली गावात अंदाजे चारशे घरे आहेत. हा संपूर्ण भाग आदिवासीबहुल असून तेथील ग्रामस्थांना शिधापत्रिका, कराची आकारणी आदी कामे करणे सोपे होणार आहे. त्याशिवाय घरांची संख्या, जनगणनादेखील सुलभ होण्याच्या दृष्टीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संपूर्ण घरांवर नावांच्या पाट्या व घर क्रमांक लावण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत. या कामाचा ठेका मुंबईतील कृपाशंकर गुप्ता यांना दिला असून आतापर्यंत गिरनोली गावात तीनशेहून अधिक पाट्या बसवण्यात आल्या आहेत.
घरामागे ५० रुपयांची लूट
गिरनोलीमधील घरांवर पाट्या लावल्यानंतर त्याचे पैसे संबंधित मालकाकडूनच वसूल करण्यात येत आहेत. सरकारची योजना असूनही प्रत्येक घरामागे ५० रुपयांची लूट होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
या आहेत चुका
चिंतामण पांडू तांबडी (घर क्रमांक १९५) यांचे नाव ‘चिन्तामण पाण्डू तावडे’ असे दिसत आहे. कुंदा चिंतामण तांबडी (घर क्रमांक ४४३) यांचे नाव ‘कुन्दा चित्तामण ताम्बडी’ अशा प्रकारे दिसून येते तर विजय वाल्या वळवी (घर क्रमांक १२२) यांचे नाव ‘विजय वल्या वलवी’ असे लिहिले आहे. गिरनोली गावातील अनेकांच्या घरांची नावे नीट वाचताही येत नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मनसेचा आंदोलनाचा इशारा
बोईसरमधील मराठी भाषेची मोडतोड केल्याचे समजताच मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विजय गांगुर्डे, मितेश राऊत, धीरज पाटील, अजित आंबेलकर हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पालघर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन याचा जाब विचारला असून लवकरात लवकर या पाट्या बदलून शुद्ध मराठीत लिहाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.






























































