
सामना प्रतिनिधी । सेलू
सध्या राज्यासह परभणी जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना केवळ राजकीय अनास्था व अधिकार्यांच्या व कर्मचार्यांच्या अडलेतट्टू धोरणामुळे दूध व्यवसाय पूर्णपणे अडचणीत येत आहेत. तसेच विविध कारणे पुढे करून सेलू, पाथरी यासह इतर तालुक्यातील दूध व्यवसायातून आर्थिक उन्नती साधण्यास प्रयत्न करणार्या शेतकर्यांच्या दुधाबाबत विविध जाचक तपासण्या करून दूध परत करण्याचा प्रकार पाथरी दूध केंद्रावर होत आहे. याबाबत पाथरीचे आमदार मोहन फड यांनी दुग्ध विकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना पत्र लिहून शेतकर्याच्या बाजूने भूमिका घेतली आहे. इतर आमदार व लोकप्रतिनिधी शेतकर्याच्या व्यथा कधी सोडवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकर्यांनी विविध बँकांचे कर्ज काढून शेतीला जोडधंदा म्हणून सेलू व पाथरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या भीषण दुष्काळ पडलेला असल्याने चार्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न समोर असतांनाही शेतकरी दूध व्यवसाय करीत आहेत. परंतु पाथरी दूध संकलन केंद्रावर मात्र ज्या संस्था दूध संकलन करून दूध देतात त्यांच्या दुधाला जाचक व अवास्तव तपासण्या करून दूध परत करण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे थेट शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पाथरील क्षमता नसतांनाही जास्तीचे दूध संकलन होत आहे. ही बाब खर्या अर्थाने शेतकरी दूध व्यवसायाकडे वळत असल्याचे लक्षण आहे. याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा जास्त दूध येत आहे म्हणून दुधाच्या अवास्तव तपासण्या करून दूध परत केले जात आहे. यापेक्षा पाथरी येथे दूध संकलनाची क्षमता वाढवावी तसेच सेलू येथे दूध संकलन केंद्र सुरू करावे आशा उपाययोजना करण्यापेक्षा दूध परत करण्याचे प्रकार वाढल्याने शेतकरी देशोधडीला लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याकडे लोकप्रतिनिधी मात्र कशामुळे दुर्लक्ष करीत आहेत? हेही प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात दुधावरून राजकारण होते. एवढी क्षमता या व्यवसायात असतांना राजकीय नेते मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परंतु पाथरीचे आमदार मोहन फड यांनी मात्र शेतकरी व संस्थाचालक यांची बाजू घेऊन दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी थेट पत्र लिहून बाजू मांडली आहे. पत्रात म्हटले आहे, भीष्म दुष्काळ असतांना शेतकरी दूध व्यवसायाकडे वळला आहे. शासन देखील शेतकर्यांना दूध व्यवसायाकडे शेतीला जोडधंदा म्हणून सुरू करण्याचे सुचवत आहे. परंतु केवळ ऑनलाईन पेमेंट नसल्याने दूध संस्थेचे कमिशन कपात होत आहे. हा प्रकार केवळ परभणी जिल्ह्यात होत असल्याने दूध संस्थेचे कमिशन कपात करू नये. तसेच दूध संस्थांना प्रतिदिन दूध संकलन मर्यादा ठेऊ नये, पाथरी दूध संकलन केंद्रावर दूध संकलन वाढत असल्याने चुकीच्या व अवास्तव तपासण्या करून दूध नाकारणे बंद करावे असे पत्रात म्हटले आहे. दूध व्यवसायामुळे शेतकर्यांची आर्थिक उन्नती होत आहे. याबद्दल आमदार मोहन फड यांनी स्पष्ट पत्र लिहिले आहे. परंतु इतर आमदार व लोकप्रतिनिधी शेतकर्यांच्या व दुध संकल करणार्या संचालकांचा पाठीशी उभे राहणार का? अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे.
































































