सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर एमआयएम खासदाराचा तिळपापड

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम जन्मभूमीप्रकरणी निकाल दिल्यानंतर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचा तिळपापड झाला आहे. 28 वर्षांपासून आम्ही पाच एकर जागेसाठी लढलो नसल्याचे सांगत त्यांनी दिलेली पाच एकर जागाही आम्हाला नको, असा सूर शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लावला.

अयोध्येतील रामजन्मभूमीबाबतचा निकाल शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. या निकालामुळे पोटशूळ उठलेल्या एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचे सांगत निकालाबाबत नाराजी व्यक्त्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा अभ्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड करणार आहे. तसेच निकालाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्कालीन काँग्रेस सरकारने बाबरी मशिदीचे कुलूप उघडल्यामुळेच दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होऊन मशीद पाडण्यात आली. या पाच एकर जागेवर काँग्रेसने काँग्रेसभवन बांधावे आम्ही स्वखर्चाने मशीद बांधू, असे देखील जलील यांनी सांगितले. देश हा हिंदुराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असून वेळीच या प्रकाराला न रोखल्यास हिंदुस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी होईल, अशी टीकाही जलील यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या