सत्ता आल्यापासून नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा फक्त वापर करून घेण्यात आला आहे. सभा आणि कार्यक्रमांना गर्दी करण्यासाठीच फक्त त्यांना बोलावले जात होते. कोणत्याही महत्त्वाच्या पदांसाठी त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न करता आता दोन्ही मतदारसंघ नाईक कुटुंबाच्या घशात घालण्यात आले आहेत अशी नाराजी व्यक्त करीत विजय नाहटा यांनी मिंधे गटाला रामराम ठोकला आहे. येत्या दोन दिवसांत नाहटा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
वाशीतील मेळाव्याला संबोधित करताना विजय नाहटा यांनी मिंधे गटावर टीका केली. गेल्या तीन दिवसांपासून मी मुख्यमंत्र्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होतो, मात्र फोन घेण्यात आला नाही. खासदार नरेश म्हस्केही फोन घेत नव्हते. आता मी रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्यानंतर मला थांबण्याची विनंती करीत आहेत. मात्र आता मी थांबणार नाही. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे. 2019 ला मला थांबवण्यात आले. आता मी माझा गेम होऊ देणार नाही. मलाही माझे पॉलिटीकल करीअर महत्त्वाचे आहे, असेही नाहटा यांनी यावेळी स्पष्ट केले.