
लसीकरण करताना महिलांबरोबरच विद्यापीठांचे विद्यार्थी, कामावर जाणारे नागरिक यांचा लसीकरणात प्राधान्याने समावेश करावा. दुसरा डोस झाल्यानंतर ज्या इमारती, कार्यालये, गृहनिर्माण सोसायटय़ांमधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल, त्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केल्या.
कोविडच्या आपत्तीवर मात करण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिह्यातील लसीकरणाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला. याबरोबरच कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला. मागील आठवडय़ात फक्त महिलांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एका दिवसात मुंबईत 1.27 लाख महिलांचे लसीकरण करण्यात यश आले. याबद्दल संबंधित यंत्रणांचे अभिनंदन आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केले. संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरुद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनेचा आढावा घेतला. व्हेक्टर बॉर्न डिसीजवर नियंत्रण मिळविण्याबाबत स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संबंधित उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


























































