हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय! आदित्य ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

2643

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे, पण अशा प्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल, या भ्रमात कोणी राहू नये, अशी स्पष्ट भूमिका युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.

कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही ‘कोरोना’चा पराभव करण्यासाठी शर्थ करत आहे. बहुधा महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून जी चिखलफेक सुरू आहे ती एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

तपास भरकटवण्याचा प्रयत्न

सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पोलिसांना माहिती द्या

मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. आरोप करणाऱ्य़ांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेकी करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये, असे आदित्य ठाकरे यांनी शेवटी बजावले आहे.

माझा काडीमात्र संबंध नाही

मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे ‘बॉलीवूड’ हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. या सगळ्यांचा उपयोग मी शिवसेनेच्या सामाजिक कार्यासाठी करून घेत असतो. जसे आपले पंतप्रधान मोदी करून घेतात, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या