
शिवसेना आमदार व राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या घरासह सात ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज छापे मारले. मनीलाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाल्याचा दावा ईडीने केला. आज पहाटेपासून 13 तास ईडीकडून परब यांची चौकशी सुरू होती. ईडीच्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे दिलेली असून यापुढेही चौकशीला सामोरा जाईन असे परब यांनी या चौकशीनंतर सांगितले.
कोकणातील दापोली येथील ‘साई रिसॉर्ट’चा संबंध ईडीने अनिल परब यांच्याशी जोडून ही चौकशी केली. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा ईडीचा आरोप आहे. त्याआधारे ईडीने परब यांचा शासकीय बंगला ‘अजिंक्यतारा’, वांद्रे येथील त्यांचे राहते घर यावर छापे घातले. त्याचप्रमाणे परब यांच्या जवळच्या सहकाऱयांवरही छापे घातले गेले. सायंकाळी सुमारे साडेसात वाजेपर्यंत परब यांची चौकशी सुरू होती.
मनीलाँड्रिंगचा विषय आला कुठे?
अनिल परब पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘दापोलीच्या ‘साई रिसॉर्ट’चे मालक हे सदानंद कदम आहेत. ते रिसॉर्ट अद्याप पूर्णही झालेले नाही. त्याचसंदर्भात ईडीने आजची कारवाई केली. परंतु यात मनीलाँड्रिंगचा विषय आला कुठे हेच समजलेले नाही. मी चौकशीला सामोरा गेलेलो आहे आणि पुढेही जाईन.



























































