
महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्याचा हट्ट धरणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरू आहे, तर नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे दादा भुसे असा वाद आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार रायगडमध्ये आदिती तटकरे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत.
अजितदादा स्वातंत्र्यदिनी बीडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या जागी मंत्रिमंडळात आलेले छगन भुजबळ हे गोंदिया येथे ध्वजारोहण करणार आहेत. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे.