
एकाही शेतकऱ्याला खत मिळाले नाही,असे होणार नाही. शेतकऱ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण खते आणि बियाणे वाजवी दरात उपलब्ध करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. यासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गैरप्रकार झाल्यास कसलीही तडजोड केली जाणार नाही. हयगय करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवरही थेट कारवाई करण्याचा इशारा कृषीमंत्री दादा भुसे कोल्हापूरमध्ये मंगळवारी दिला.
जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे,खासदार धैर्यशील माने ,आमदार प्रकाश आबिटकर,आमदार राजेश पाटील,जिल्हाधिकारी दौलत देसाई,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे आदी पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. शासनाने यंदाचे वर्ष उत्पादकता वर्ष म्हणून घोषित केले आहे. शेतीची उत्पादकता वाढ, दर्जेदार उत्पादन अणि शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमालाची विक्री या त्रिसूत्रीवर शेती विभागाने भर दिला आहे.राज्यातील विषेशत: कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी युरिया खतापासून वंचित राहु नये,अशी व्यवस्था शासनामार्फत केली आहे. तसेच युरिया खत खरेदी करतांना दुकानदारांकडून अन्य वस्तु (लिंकिंग) खरेदी करण्याची शेतकऱ्यांना सक्ती होणार नसल्याची ग्वाही देत, दुकानदारांनी दर्शनी भागात खतांचे प्रकार, साठा आणि शासकीय किंमत यांचे ठळकपणे फलक लावावेत. तसेच मराठवाडा येथे आलेल्या अनुभवानुसार सोयाबिन पिकाच्या उगवण क्षमतेबाबत कृषि अधिकाऱ्यांना दक्ष आणि सजग रहाण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
खते आणि बियाणे विक्रीचे परवाने विकास सेवा सोसायट्यांना देण्यासंदर्भात अडचणी दूर करण्यात येतील. शेतीसाठी वीज कनेक्शन तात्काळ मिळावेत यासाठी विद्युत विभागामार्फत लवकरच नवीन धोरण आणले जात आहे. तसेच ऊसाचे अधिकाधिक क्षेत्र ठिबकवर आणण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन काळात कुठेही चढ्या दराने अन्नधान्य, भाजीपाला, फळे मिळाली नाहीत. याचे सर्व श्रेय शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे समाजानेही मिळेल तिथे शेतकऱ्यांना पुढे येऊन मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यातील कृषि विभागाच्या आढावा बैठकीत जिल्ह्यात यंदा खरिप पीकांमध्ये प्रमुख सात पीक सोडुन ऊस,सोयाबीन,भुईमूग आदी पिकांची 75 ते 80 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तर 1240 कोटी मंजुर पीक कर्जापैकी 1180 कोटी रुपयांचे वाटप 1 लाख 15 हजार 642 खातेदारांना झाले आहे. यामध्ये सहकारी बॅंकाकडून 145 टक्के, राष्ट्रीयकृत बँकांकडुन 38 टक्के, खाजगी बॅंकांकडून 43 टक्के तर ग्रामीण बॅंकांकडून केवळ 2 टक्के कर्ज वाटप झाल्याची माहिती बैठकीत कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात 46 हजार 573 शेतकरी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र झाले आहेत.त्यांना पुन्हा पीककर्ज देऊन उभं करण्यास शासनाचे प्राधान्य राहील अशी ग्वाही देत,यंदा खरिप पिकांसाठी 1240 कोटी मंजुर पीक कर्जापैकी 1180 कोटी असे 75 टक्के कर्जवाटप झाले असून,येथे कृषि विद्यापीठ निर्माण करण्यास शासन सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्रिसूत्रीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न साकारणार
शेतकरी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प किमतीत दर्जेदार खते व बियाणे मिळावीत, शेतमालाचे दर्जेदार उत्पादन आणि त्यातुन शेतकऱ्यांना चांगला मोबदला अशी साधी व सोपी त्रिसुत्री त्यांनी दिली आहे. त्यानुसार राज्याचा कृषीविभाग वाटचाल करत असून चिंतामुक्त शेतकरी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न याद्वारे साकारण्याचा प्रयत्न करत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.





























































