
‘अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या गोपनीय फाईल्सच्या आधारे काँग्रेसने आज मोदी सरकारवर नवा बॉम्ब टाकला. ‘मोदी सरकारचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे एपस्टीनशी घनिष्ठ संबंध होते. या दोघांमध्ये तब्बल 62 ई-मेल्सची देवाणघेवाण झाली. त्यांच्या नऊ वेळा भेटी झाल्या होत्या. हा सिलसिला मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काही महिन्यांतच सुरू झाला होता,’ असा दावा काँग्रेसने केला. पुरी व एपस्टीनमध्ये मोदी सरकारच्या धोरणांवर चर्चा झाल्याचा आरोपही काँग्रेसने केला. पुरी हे एपस्टीनशी इतके काय बोलत होते? सरकार नेमके काय लपवत आहे,’ असा सवाल काँग्रेसने केला.
अमेरिका सरकार खुल्या केलेल्या एपस्टीन फाईल्समध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा उल्लेख अनेकदा आला आहे. हरदीप पुरी यांनी त्यावर नुकताच खुलासा केला. ‘एपस्टीनशी माझे फार बोलणे झाले नव्हते. दोन ई-मेल आणि तीन-चार भेटी झाल्या होत्या. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल आम्हाला खात्रीशीर माहिती नव्हती, असे पुरी म्हणाले होते. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरी यांचे हे दावे खोडून काढले.
पुरी यांनी सरकारची धोरणात्मक माहिती एपस्टीनला पुरवल्याचा दावाही खेरा यांनी केला. जुलै 2015 मध्ये ‘डिजिटल इंडिया’चा प्रारंभ होण्यापूर्वीच 13 नोव्हेंबर 2014 रोजी एपस्टीनने रीड हॉफमनला लिहिलेल्या ई-मेलमध्ये याची सगळी माहिती होती,’ असे खेरा म्हणाले.
गेल्या 12 वर्षांपासून हे सगळं सुरू आहे. एपस्टीन प्रकरण 2014 पासूनच सुरू झालं होतं. मधल्या काळात पेगासस, राफेल प्रकरणही झालं. आता सगळे तुकडे जुळू लागलेत. सत्याचा विजय होतोच. सत्य विजयाच्या उंबरठ्यावर आहे. लिहून ठेवा.
भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कावळे हंस होऊ लागलेत!
‘सध्या कावळय़ांची संख्या घटत असून राजहंसांची संख्या वाढत आहे. यामागच्या कारणांचा आम्ही शोध घेतला असता तो भाजपशी येऊन थांबला. जितके कावळे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घुसतात तितके हंस बनून बाहेर पडतात, असे आमच्या लक्षात आले. एपस्टीन फाईल्समध्ये नाव असलेल्या बिल गेट्सचे हिंदुस्थानात होऊ घातलेले स्वागत आणि हरदीप पुरी यांना पंतप्रधान मोदींनी दिलेल्या शुभेच्छा हा याच प्रक्रियेचा भाग आहे.’
हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण कोण ठरवते?
पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी मे 2015 मध्ये हिंदुस्थानचा दौरा केला होता. त्यानंतर जून 2015 मध्ये पुरी यांना लिहिलेल्या एका ई-मेलमध्ये एपस्टीनने मध्य पूर्वेच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांनी नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला. एपस्टीनच्या नाराजीमुळेच मोदी हे पॅलेस्टाईनऐवजी इस्रायलला गेले होते का? हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण नेमपं कोण ठरवत होतं?’ असा सवाल पवन खेरा यांनी केला.
नऊ वेळा भेट
5 जून 2014
6 जून 2014
8 जून 2014
9 जून 2014
19 सप्टेंबर 2014
13 सप्टेंबर 2014
24 सप्टेंबर 2014
9 ऑक्टोबर 2014
10 ऑक्टोबर 2014
62 ई-मेल
32 ई-मेल हरदीप पुरी यांनी एपस्टीनला पाठवले. 30 ई-मेल एपस्टीनने हरदीप पुरी यांना पाठवले. हरदीप पुरी यांचा बचाव केविलवाणा आहे असे सांगत खेरा यांनी एपस्टीन आणि पुरी यांच्यातील भेटी आणि ई-मेल्सची आकडेवारीच दिली. हरदीपसिंग पुरी यांनी राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी त्यांनी केली.
























































