मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे. यशोमती ठाकूर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यासाठी नागरिकांनी कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करीत नववर्षाचे स्वागत, सण, उत्सव, लग्न समारंभ आदी कार्यक्रम साधेपणाने व कमीत-कमी नागरिकांच्या उपस्थितीत साजरे करावे, असे त्या यावेळी म्हणाल्या.