मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणी शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती

काँग्रेस नेत्या आणि महिला – बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने मोठा दिलासा आहे. पोलीस कर्मचारी मारहाण प्रकरणी शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

पोलीस कर्मचार्‍याला मारहाण प्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने 15 ऑक्टोबर रोजी 3 महिने व 15 हजाराची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने अमरावती जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

24 मार्च 2012 रोजी  पोलिसांशी  हुज्जत घातल्या प्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस कॉन्सेटबलवर हात उगारल्याचा ही त्यांच्यावर आरोप होता. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचार्‍याला मारहाण आदी कलमं यशोमती ठाकुरांवर लावण्यात आली होती.

या प्रकरणी जिल्हा न्यायालायाच्या न्या. उर्मिला जोशी यांनी यशोमती ठाकूर यांना 3 महिने व 15 हजाराची शिक्षा सुनावली होती.

या प्रकरणी भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलने केली होती. तसेच यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली होती. परंतू ‘एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.’ असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या