पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या संवादावेळी एलॉन मस्कची उपस्थिती? परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नुकत्याच झालेल्या दूरध्वनी संभाषणावरून सध्या जागतिक राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. या चर्चेत अमेरिकन उद्योगपती आणि एक्सचे मालक एलॉन मस्क हे देखील सहभागी होते, असा दावा काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी केला होता. मात्र हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आता यावर अधिकृत स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, २४ मार्च रोजी झालेला हा संवाद केवळ पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातच झाला होता. आम्ही या संदर्भातील बातम्या पाहिल्या आहेत, परंतु हे संभाषण फक्त दोन नेत्यांमध्येच झाले असून, याद्वारे पश्चिम आशियातील परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली, असे प्रवक्त्यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले.

न्यूयॉर्क टाइम्ससारख्या (NYT) प्रतिष्ठित वृत्तपत्राने असा दावा केला होता की, एका भू-राजकीय संकटाच्या काळात दोन देशांच्या सर्वोच्च नेत्यांमधील चर्चेत एलॉन मस्क या खाजगी नागरिकाने सहभाग घेतला होता. मात्र हिंदुस्थनांच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळला आहे.