अल्पवयीन मुलाला दुचाकी देणे वडिलांना पडले महागात

अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यासाठी देणे त्याच्या वडिलांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोटारवाहन कायद्यात केंद्र सरकारने नुकतीच सुधारणा केलेली आहे. या सुधारित कायद्यान्वये दाखल झालेला हा जिह्यातील पहिलाच गुन्हा ठरला आहे.

सुधारित मोटारवाहन कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहन चालविण्यास बंदी आहे. असे असतानाही कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरातील मोतीनगर येथे राहणाऱ्या एका 52 वर्षीय व्यक्तीने त्यांच्या मालकीची दुचाकी त्यांच्या 17 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलास चालविण्यास दिली. हा मुलगा दुचाकी घेऊन सुरेगाव शिवारात असलेल्या कारखान्याच्या उद्यानासमोर गेला. तेथे पोलिसांनी त्याला थांबविल्यानंतर त्याच्याकडे वाहन परवाना दाखविण्याची मागणी केली. मात्र, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्याला वय विचारले असता, त्याने 17 वर्षे असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या विरोधात मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 5/180 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. कॉन्स्टेबल प्रकाश सुरेश नवाळी यांनी फिर्याद दिली आहे.