विमान प्रवासात प्रवाशाची बॅग हरवली तर त्याला एअरलाइन्सकडून नुकसानभरपाई मिळते. मात्र इंडिगो एअरलाइन्सने एका प्रवाशाला त्याची बॅग हरवली म्हणून अगदी नाममात्र भरपाईची ऑफर दिली. ही भरपाई म्हणायची की चेष्टा, असा सवाल उपस्थित झालाय. इंडिगो विमानाच्या कोलकाता-गुवाहाटी प्रवासात 7 जुलै रोजी ही घटना घडली.
बॅग कोलकाता येथे चेकइन करण्यात आली होती. मात्र गुवाहाटी विमानतळावर बॅग पोचली नाही. मोनिक शर्मा असे प्रवाशाचे नाव असल्याचे समजते. ‘बॅगेत 45 हजार रुपयांच्या सामानासह ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्डसारखी महत्त्वपूर्ण कागदपत्रे होती. तरीही इंडिगोने प्रवाशाला फक्त 2,450 रुपये नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविली. ही तर चेष्टा म्हणावी लागेल.
इंडिगोची बॅगेज डिले अँड लॉस्ट प्रोटेक्शन सर्व्हिस आहे. याअंतर्गत देशांतर्गत प्रवासासाठी प्रति बॅग 19 हजार रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रति बॅग 66 हजार रुपये दिले जातात. बॅगेमध्ये कुठलेही सामान असले तरी ही भरपाई लागू आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क घेतले जाते. देशांतर्गत प्रवासासाठी 95 रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 330 रुपये शुल्क आहे.