अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बापानेच केला 50 हजाराला सौदा

प्रातिनिधिक फोटो

एका हैवान बापाने अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची तक्रार न करता तिच्या बलात्काऱ्याकडून लाच घेतल्याची संतापजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर येथील हे प्रकरण असून या माणसाने एका निरपराध तरुणाला या प्रकरणात गोवल्याचंही उघड होत आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, येथील देहात नावाच्या गावात पीडिता आपल्या वडिलांसोबत राहते. 30 एप्रिल रोजी गावातील एका तरुणाने तिला खोट्या बहाण्याने बागेत घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. घरी परतल्यानंतर पीडितेने वडिलांना याबाबत सांगितलं. तेव्हा त्याने पोलीस स्टेशनमध्ये न जाता आरोपीचं घर गाठलं आणि त्याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने दुसऱ्या एका निरपराध तरुणाविरुद्ध बलात्काराची तक्रारही दाखल केली.

या प्रकरणानंतर पोलिसांनीही तिला खोटी जबानी देण्यास भाग पाडलं, असा आरोप पीडितेने केला आहे. आरोपीने तिला त्यानंतर आपल्या गावी न्यायचा प्रयत्न केला. पण तिथून दोन वेळा पळून जायचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळा आरोपीने तिला पकडून पुन्हा गावी नेलं, असं पीडितेचं म्हणणं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या