बदलापुरात शाळकरी मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बदलापुरात घडली आहे. 16 वर्षाच्या मुलीवर बापानेच अनेकदा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे. घटना उघड होताच आरोपी बाप फरार झाला आहे.
दोन चिमुरड्यांवरील अत्याचाराचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. नराधमाच्या फाशीची मागणी होत आहे. असे असतानाच बदलापुरात आणखी घटना उघडकीस आल्यानंतर मुलींच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तिचा बाप वारंवार तिला मारहाण करायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. या त्रासाला कंटाळून मुलगी घर सोडून पळून गेली, पण नंतर घरी परतली. अखेर सोमवारी सायंकाळी तिने पोलिसांशी संपर्क साधला आणि नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 64 (बलात्कार), 74 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर अत्याचार करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे) आणि 75 (लैंगिक छळ) आणि 118 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे) आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.