अल्पसंख्याक प्रमाणपत्रांची खैरात, उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काही तासांतच राज्यातील शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारे प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. यामध्ये कोणी गडबड केली आहे, त्यांच्यावर कारवाई होईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर काही तासांतच सामान्य प्रशासन विभागाने अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या बदलीचे आदेश जारी केले.

अल्पसंख्याक विकास विभागाचे तत्कालीन मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारे प्रमाणपत्र जारी करण्यावर स्थगिती दिली होती. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवला होता. त्यावेळी प्रमाणपत्र जारी करण्यावरील स्थगिती कायम होती. 28 जानेवारी रोजी बारामतीत अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.

 अजितदादांना श्रद्धांजली म्हणून सरकारने त्या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवली होती. तरीही त्याच दिवशी अल्पसंख्याक विकास विभागाकडून आठ शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्रे जारी करण्यात आली. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

इतर अधिकारीही अडकणार

शेणॉय यांची बदली करताना त्यांची नियुक्ती अन्य विभागात दाखवलेली नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत शेणॉय यांना नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत राहावे लागले. शैक्षणिक संस्थांकडून अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत प्रस्ताव आल्यानंतर त्याची पुढील कारवाई शेणॉय यांच्याकडून होते. याविषयी संस्थांची सुनावणी घेण्याचे आणि त्यावर निर्णय घेऊन अंतिमतः प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार शेणॉय यांना आहेत. त्यामुळे या प्रकरणी शेणॉय आणि इतर अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.