
पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांत बिबट्याचे हल्ले वाढत असताना आता मीरा-भाईंदर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे समोर आले आहे. येथील जेपी ग्राउंड मैदान जवळ असलेल्या पारिजात इमारतीमध्ये बिबट्या शिरला असून त्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अंजली टाक ( पारिजात बिल्डिंग – ए विंग) असे जखमी झालेल्या एका तरूणीचे नाव आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत; थेट इमारतीत शिरला, हल्ल्यात तीन जण जखमी pic.twitter.com/GlCvhV3J0Y
— Saamana Online (@SaamanaOnline) December 19, 2025
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या पथकालाही घटनास्थळी दाखल झाले आहे. इमारतीचा परिसरत पोलिसांनी घेराव घातला असून बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच बचाव कार्य पूर्ण होईपर्यंत परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



























































