शहरात जागोजागी रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांची मोठी समस्या सध्या भाईंदरवासीयांना भेडसावत आहे. या अवैध पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने पश्चिम भागात खासगी बस गाड्या पार्किंगसाठी जागा निश्चित केली आहे. त्याचबरोबर मालक-चालकांकडून वाहनतळ शुल्क आकारणीदेखील करण्यात येणार असल्याने भाईंदरमधील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून मीरा- भाईंदर शहरात खासगी बस गाड्या रस्त्यावर पार्किंग करत असल्याचा मुद्दा गाजत आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना याचा नाहक त्रास होत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्याबरोबर रात्रीच्या अंधारात गाडीच्या पाठीमागे मद्यसेवनाचे कार्यक्रम केले जात असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांकडून कारवाई केली जात नव्हती. वाहनतळ परिसरात हायमास्ट लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश आयुक्त संजय काटकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या जागा केल्या निश्चित
भाईंदर पश्चिम येथील महेश्वरी भवन तसेच सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ खासगी बसच्या पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली असून या बस गाड्यांना वाहनतळ शुल्क आकारून करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्न वाढवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.