अधुरं स्वप्न नव्हे, यंदा पदकच; मीराबाईचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू पुन्हा एकदा रणांगणात उतरण्यास सज्ज झाली आहे. यंदा तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘अधुरं स्वप्न’ पूर्ण करायचंच, हा निर्धार केला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून देशाची मान उंचावणारी चानू आता आशियाई स्तरावरचा हिशेब चुकता करण्याच्या तयारीत आहे.

अपूर्ण लढाई पूर्ण करण्याची जिद्द

‘खेलो इंडिया जनजातीय खेळांच्या उद्घाटनावेळी चानूने स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, आशियाई क्रीडा स्पर्धा माझ्यासाठी स्पर्धा नाही, ती अपूर्ण लढाई आहे. जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱया या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती पूर्ण ताकदीने सज्ज आहे.

संघर्षमय प्रवास अन् पदकाची हुलकावणी!

गेल्या दशकात हिंदुस्थानी वेटलिफ्टिंगचा चेहरा बनलेल्या चानूला आशियाई खेळांत मात्र यशाने दगा दिला. 2014 मध्ये तिला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मग 2018 मध्ये दुखापतीमुळे ती बाहेर फेकली गेली तर 2022 मध्ये पदकाच्या उंबरठय़ावरून ती मागे पडली. पण यावेळी ती अपयशाचा हा इतिहास बदलण्याच्या निर्धाराने पेटून उठली आहे.

वजनाचा खेळ हेच खरं आव्हान

चानूसमोर केवळ प्रतिस्पर्धी नाहीत, तर वजन गटाचं कठीण गणितही आहे. 48 किलो गटातून 49 किलो गटात झेप घेताना शरीर आणि कामगिरी यांचा समतोल राखणं-हीच खरी परीक्षा ठरणार आहे. काही आठवडय़ांत हा बदल साधणं म्हणजे तारेवरची कसरतच!

अखेरची संधी की सुवर्ण इतिहास?

31 वर्षीय चानूसाठी ही स्पर्धा कदाचित शेवटची मोठी संधी असू शकते, पण हीच संधी ती सुवर्णाक्षरांनी लिहिण्याच्या इराद्याने उतरतेय. आता एकच प्रश्न की हा निर्धार पदकात बदलणार का? अवघ्या देशाची नजर तिच्या कामगिरीवर खिळली आहे.