मिऱ्या नागपूर महामार्ग – दोन दिवसात 140 बांधकामांवर हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिर्‍या – नागपूर प्रस्तावित महामार्गाच्या शेजारील अतिक्रमणांवर दुसर्‍या दिवशीही हातोडा फिरवण्यात आला. महामार्गाच्या भूसंपादनामुळे पाचपट भाव मिळेल या हेतूने अनेकांनी महामार्गाच्या शेजारी अतिक्रमणे केली होती. या वाढत्या अतिक्रमणांमुळेच अखेर जिल्हा प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागला.

गेल्या दोन दिवसात एकूण 140 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे साळवीस्टॉप ते टीआरपी दरम्यानच्या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे.

मिर्‍या – नागपूर या प्रस्तावित महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. या महामार्गाच्या शेजारी अनेकांनी गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये बांधकामे केली. काहींनी टपऱ्या उभारल्या होत्या तर काहींनी चिऱ्यांची बांधकामे करुन व्यवसाय थाटले होते. या अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारी आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सर्वांना नोटीसा पाठवल्या होत्या. नोटीसा पाठवूनही त्याकडे कोणीही दाद दिली नाही़. उलट अतिक्रमणे वाढत गेली.

साळवीस्टॉपपासून सुरु झालेली अतिक्रमणे टीआरपीपर्यंत पोहोचली. रस्त्याच्या दुतर्फा टपर्या आणि दुकाने उभी राहिली. त्यामुळे परिसरात बकाल अवस्था निर्माण झाली होती. अखेर शुक्रवारपासून मिर्‍या – नागपूर महामार्गाच्या शेजारी असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु झाली. महामार्गाच्या 15 मीटरच्या अंतरातील जुन्या आणि नव्या सर्वच बांधकामांवर हातोडा फिरवण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने टपऱ्या उचलण्यात आल्या.

पोकलेन आणि बुलडोझरच्या सहाय्याने बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. शुक्रवारी एकूण 65 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. आज शनिवारी संध्याकाळपर्यंत 75 अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरवण्यात आला. दोन दिवसात एकूण 140 बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली.