
सामना प्रतिनिधी । मालवण
गेले दोन दिवस बेपत्ता असलेल्या आचरा जामडुलवाडी येथील मनीष सूर्यकांत पाटील (४५) या तरुणाचा मृतदेह हडी कालिका मंदिर नजीक कालावल खाडी पात्रात सापडून आला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
आचरा जामडुल येथील मनीष पाटील हे २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घराबाहेर पडले होते. मात्र ते गेले दोन दिवस घरी परतले नाहीत. मात्र काल दुपारी त्यांचा मृतदेह हडी येथील कालिका मंदिर नजीक कालावल खाडी पात्रात तरंगताना स्थानिक ग्रामस्थांना आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील हे करत आहेत. मनीष पाटील यांच्या पत्नीचे तीन वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.





























































