साय-फाय – मिशन रेस्क्यू

>>प्रसाद ताम्हनकर

तुर्की मध्ये भूकंपामुळे जी काही प्राणहानी आणि वित्तहानी झाली आहे, तिचे दर्शन जगाला हादरवणारे आहे. या विनाशकारी भूकंपात हजारो लोकांचा जीव गेला आहे आणि अनेक इमारतीदेखील उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तुर्कीच्या या विनाशकारी भूपंपानंतर जगभरातील प्रमुख देशांनी बचावकार्य करणारी पथके तुर्कीकडे रवाना केली. या पथकातील लोकांनी आपल्या कार्यक्षमतेने अनेक निष्पाप जिवांचा बचाव केला. त्यांच्या या कार्याचे जगभरातून कौतुक होत आहे.

भूकंपासारख्या आपत्तीनंतर तातडीने तिथे धाव घेणारी बचाव पथके नक्की काम तरी कसे करतात? भूकंपामुळे हानी झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बचाव पथके प्रथम इमारतींच्या नुकसानीचा अंदाज लावतात. सर्वप्रथम किती इमारती कोसळल्या आहेत, किती राडारोडा जमा झाला आहे आणि त्यात किती लोक गाडले गेले असण्याची शक्यता आहे, याचा अंदाज लावला जातो. त्यानंतर प्रथम रिकाम्या आणि मोकळय़ा जागांवर शोधकार्य सुरू होते. या शोधकार्यात इतर कर्मचारी इमारतींमधील हालचालींवर, ढिगाऱयावर लक्ष ठेवतात आणि येथून येणारे आवाज अतिशय काळजीपूर्वक टिपत असतात.

जी इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, अशा इमारतीला शोधकार्यात प्राथमिकता दिली जात नाही. इथे उशिरा लोकांचा शोध घेतला जातो. कारण इथे कोणी जिवंत उरले असण्याची शक्यता नगण्य असते. बचाव पथके ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर करतात. यामध्ये खोदण्यासाठी ड्रिलर मशीनपासून ते हायड्रॉलिक जॅकपर्यंतचा समावेश असतो. इमारतीचे कोसळलेले काँक्रीट स्लॅब काढण्यासाठी उत्खनन यंत्रांचा वापर केला जातो, जेणेकरून बचाव पथकाला आत गाडल्या गेलेल्या लोकांची स्थिती जवळून पाहता येईल. याशिवाय बचाव पथक लवचीक खांबांच्या मदतीने ढिगाऱयांमधील रिकाम्या जागेत व्हिडीओ कॅमेरेदेखील पोहोचवायचे काम करते. त्यांच्या मदतीने गाडल्या गेलेल्या लोकांना शोधणे थोडे सोपे होते. याशिवाय विशेष ध्वनी उपकरणेदेखील बचाव पथकाद्वारे वापरली जातात, जी काही मीटरच्या अंतरात होणारा थोडासा सूक्ष्म आवाज पकडण्यास सक्षम असतात. त्यांच्या मदतीने ढिगाऱयात अडकलेल्यांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यंत्रसामग्रीबरोबरच बचाव पथकाकडून रेस्क्यू डॉगचीदेखील मदत घेतली जाते. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता प्रचंड असते. जेव्हा एखाद्या प्रचंड मोठय़ा ढिगाऱयाखाली कोणी अडकले आहे का, याचा अंदाज लावणे अवघड बनते तेव्हा अशा प्रशिक्षित रेस्क्यू डॉगची मदत घेतली जाते. अशा कुत्र्यांच्या मदतीने अत्यंत कमी वेळात खूप मोठय़ा जागेची तपासणी करणे सोपे जाते. यादरम्यान बेशुद्ध झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी कार्बन डायऑक्साईड डिटेक्टरचा वापर केला जातो. ही पद्धत अत्यंत अरुंद अशा ठिकाणी शोध घेण्यासाठी वापरली जाते. जर एखाद्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडची घनता जास्त असेल तर याचा अर्थ तेथे अडकलेले लोक अजूनही जिवंत आहेत आणि श्वास घेत आहेत हे लक्षात येते. या जोडीला ‘थर्मल इमेजिंग’सारख्या उपकरणाचादेखील वापर केला जात असतो.

हानी झालेल्या किंवा उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे जड ब्लॉक्स आणि स्लॅब काढून टाकल्यानंतर बचाव पथक त्यांच्या हातांनी आणि लहान साधनांनी ढिगारा साफ करण्यास सुरुवात करते. या साधनांमध्ये हातोडा, कुदळ, करवत, साखळी, डिस्क कटर आणि रीबार कटिंग टूल्स यांचा समावेश असतो. त्यांच्या मदतीने लोखंडी सळय़ा आणि काँक्रीट कापून काढले जाते. अनेकदा या कामात स्थानिक लोकदेखील स्वतःहून मदतीसाठी पुढे येतात. मात्र, बचाव कार्य करताना बचाव पथकालादेखील सुरक्षेची प्रचंड काळजी घ्यावी लागले. हेल्मेट, सुरक्षित आणि मजबूत हातमोजे यांचा वापर करावाच लागतो.
[email protected]