
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आता फक्त कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवरच आपले लक्ष केंद्रित करणार आहे. आपली कारकीर्द आणखी बहरावी म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन टी-20 संघात स्टार्कला स्थान देण्यात आलेले नाही. 65 सामन्यांत 79 विकेट टिपणाऱया 33 वर्षीय स्टार्कने आता कसोटी क्रिकेट हीच आपली प्राथमिकता असून पुढील दोन वर्षांच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी स्वतःला तयार ठेवणे हेच त्याचे एकमेव ध्येय आहे. तसेच नव्या रक्ताला संधी मिळावी म्हणून त्याने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. स्टार्कचे लक्ष्य आगामी ऍशेस, हिंदुस्थानविरुद्धची कसोटी मालिका आणि 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तंदुरुस्त राहणे आहे.