मिंध्यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्याची खदखद प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या तोंडून नेहमीच बाहेर पडते. ‘प्रहार संघटनेचे वीस आमदार निवडून आणा, मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे समुद्रात विसर्जन करू!’, असा घरचा आहेरच आमदार कडू यांनी मिंध्यांना दिला. सरकारच्या योजनांमध्ये शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हिंगोलीत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील मिंधे सरकारच्या धोरणावर कडाडून हल्लाबोल केला. शेतकरी, कष्टकरी यांच्याबाबतीतील योजना सरकारकडून चुकीच्या पद्धतीने राबवण्यात येत आहेत. योजनांमध्ये शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले 15 ते 20 आमदार निवडून आणा, आपण मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे समुद्रात विसर्जन करू, असेही आमदार कडू म्हणाले.
‘लाडका मुख्यमंत्री’ योजनाही आणा!
मिंधे सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर आमदार बच्चू कडू यांनी तिखट शब्दांत टीका केली. आता लाडका मुख्यमंत्री, लाडका खासदार, लाडका आमदार, लाडका भाऊ अशी योजनाही सुरू करा. त्यासाठी प्रहार संघटनेकडून महिना दीड हजार रुपये आम्ही देऊ, असा टोलाही आमदार बच्चू कडू यांनी मिंध्यांना लगावला.