आमदार बच्चू कडूंनी वाढवले महायुतीचे टेन्शन; विधानसभेला 20 ते 25 उमेदवार देणार

अमरावती नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देऊन आमदार बच्चू कडू यांनी राणा यांचा पराभव घडवून आणला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज्यात 20 ते 25 उमेदवार देण्याची घोषणा करत बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे.

महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत उमेदवार दिला. यामुळे भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. यावरून महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच बच्चू कडू यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत, पण राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीत आमचा उमेदवार असता किंवा नसता याला काही अर्थ नाही. तुम्ही पाच वर्षांत काय काम केलं ते आधी सांगा? कधी काम केलं नाही, लोकांच्या प्रश्नांना हात घातला नाही आणि आता पराभूत झाल्यावर त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडायचे बरोबर नाही. बच्चू कडू यांनी पराभव केला आहे असे वाटत असेल तर आपण कसे वागलो याचा विचार करा, असा सल्लाही कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना दिला.