
महाराष्ट्रात अनेक लोक राजकारण करून गेले. मात्र, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती देवेंद्र फडणवीस यांनी संपवली, नासवली. फडणवीस यांनी फक्त सुडाचे राजकारण केले; असे राजकारण यापूर्वी कुणीही केलेले नाही. विरोधक, मित्र त्याचबरोबर स्वपक्षातील नेत्यांनाही त्यांनी सोडले नाही. सर्वांना संपविण्याचा सपाटाच लावला, अशी घणाघाती टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवायची की नाही हा विचार आता जनतेने करायचा आहे, असेही जाधव यांनी सांगितले.
आमदार भास्कर जाधव यांनी आज शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. दुपारच्या मध्यान्ह आरतीला उपस्थिती लावली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शिर्डीतील भाजपचे नेते शिवाजी गोंदकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रमेश गोंदकर यांच्यासह शिवसैनिकांनी जाधव यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
वाढदिवसाचे औचित्य साधून साईबाबांच्या दर्शनाला आलो. साईदर्शनानंतर मनाला शांतता वाटते, असे सांगून भास्कर जाधव म्हणाले, ‘राजकारणातलं आक्रमक आणि जहाल व्यक्तिमत्त्व म्हणून माझी ओळख आहे. मी आठवेळा निवडणुका लढलोय. जो माझ्यासमोर उभा राहिला तो पुढील निवडणुकीत माझा प्रचारक होतो, असा टोला त्यांनी लगावला. राजकारणात मी कधी कटूता ठेवत नाही, वैयक्तिक टीका-टिप्पणी करत नाही. त्यामुळेच येथे दर्शनाला माझ्यासोबत सर्व पक्षाचे नेते आहेत. हे सर्वजण माझे जुने मित्र आहेत,’ असे जाधव यांनी सांगितले.
भास्कर जाधव यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘फडणवीस बोलतात एक आणि करतात वेगळंच. त्यांच्या बोलण्यामागील दुष्ट भाव आता लोकांना कळला आहे. त्यांच्या साळसुदपणामागील चेहरा सर्व पक्षांना समजला आहे. सत्तेचा दुरूपयोग करून विरोधकांचा सूड कसा घेता येईल, विरोधी पक्ष कसे फोडता येतील आणि मी एकटाच महाराष्ट्रात कसा राहील, असे विकृत स्वप्न पाहणारा त्यांचा चेहरा जनतेने आता नाकारला आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती फडणवीस यांनी संपवली, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.