
शिवसेनेचा व्हीप मिळालाच नाही अशा उलट्या बोंबा आज मिंधे गटाने सुरू केल्या. पण एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने ई-मेलवरून पाठवलेला व्हीप मिळाला होता असा पुरावा आहे आणि तो ई-मेल आपला नसल्याचे त्यांनी कधीही सांगितले नाही, असा जोरदार युक्तिवाद करत शिवसेनेच्या वकिलांनी आमदार अपात्रता सुनावणी वेळी मिंधे गटाचा दावा खोडून काढला. शिंदे यांचा ई-मेल चुकीचा नसल्याचे स्पष्ट दिसतेय. म्हणजेच सर्वच आमदारांना व्हीप मिळाला, असे शिवसेनेच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांसमोर दाखवून दिले.
आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी आज विधान भवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. आजच्या सुनावणीमध्ये व्हीपचा मुद्दा गाजला. या मुद्दय़ावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली. परंतु शिवसेनेचे वकील देवदत्त कामत त्यामध्ये उजवे ठरले. बंडखोरी करून गुवाहाटीत पळून गेलेल्या एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांना शिवसेना पक्षाकडून व्हीप बजावण्यात आला होता. विधानसभा अध्यक्षपदाच्या मतदानासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी साळवींना मत द्यावे यासाठी तो व्हीप जारी केला होता. मात्र तो व्हीप आम्हाला मिळालाच नाही असा दावा मिंधे गटाने केला. त्यावर तो व्हीप त्यांच्या ई-मेलवर पाठवला होता, तो ई-मेल आयडी त्यांचाच होता, असे अॅड. कामत यांनी युक्तिवाद करताना सांगितले.
या सुनावणीवेळी दोन्ही गटांत पुरावे पुन्हा सादर करण्यावरून घमासान झाले. सर्व पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले असल्याने नव्याने पुरावे सादर करण्याच्या नावाने विलंब करू नका, सर्वोच्च न्यायालयातील पुराव्यांच्या आधारेच सुनावणी घ्या. वर्षभरापासून सुनावणी झाली. त्यानंतर आता शिंदे गट नव्याने पुरावे सादर करण्यास परवानगी मागत आहे, अशी बाजू देवदत्त कामत यांनी मांडली.
पुरावे सादर करण्याची गरज – नार्वेकर
व्हीपबाबत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एका गटाने सादर केलेली बाजू दुसरा गट नाकारत असेल तर यासंदर्भात पुरावे सादर करण्याची गरज आहे असा त्याचा अर्थ होतो, अशी भूमिका मांडली. दोन्ही गटाच्या सहमतीने पुरावे सादर करण्यास परवानगी देत आहोत. तसेच फेरसाक्ष घेण्याचा निर्णय घेत आहोत, असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले. दोन्ही गटाच्या वकिलांकडून सहमती देत अर्ज मंजुरी काढण्यात आले. वेळेची बचत करण्यासाठी दोन्ही गटांकडून मंजुरी देण्यात आली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे व्हीप अवैध म्हणतात, दुसरीकडे मिळालाच नाही
शिवसेनेचा व्हीप अवैध होता तसेच व्हीप पाठवणारे शिवसेनेच्या कार्यालयातील अधिकारी विजय जोशी यांना ओळखत नाही असेही शिंदे गटाचे म्हणणे आहे. एकदा म्हणतात व्हीप मिळाला आणि दुसरीकडे म्हणतात व्हीप मिळाला नाही, हे परस्परविरोधी आहे. आमच्याकडे व्हीपसंदर्भात उल्लेख असलेला अर्ज होता तो अर्जच घेऊ नये अशी मागणीही त्यांच्या वकिलांनी केली, असे अनिल देसाई यांनी सांगितले. व्हीप कोणाचा वैध होता हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातही नमूद आहे, असेही ते म्हणाले. झोपलेल्या माणसाला उठवता येते, परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज द्यावेत. 16 नोव्हेंबरपर्यंत साक्षी पुरावे द्यावेत असे सांगत अध्यक्षांनी 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे, अशी माहितीही अनिल देसाई यांनी दिली. दिवसागणिक सुनावणी घ्या असे सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सांगितले आहे, त्यामुळे सुधारित वेळापत्रक लवकरात लवकर द्या, अशी मागणी अॅड. कामत यांनी केल्याचे देसाई यांनी सांगितले.
आमदार महेश शिंदेंना स्पेशल आयडी मिळालाय का?
आमदारांच्या ई-मेल आयडीबाबत देवदत्त कामत यांनी यावेळी मिंधे गटाचे आमदार महेश शिंदे यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, महेश शिंदे यांनी महेशशिंदे 003 असा मेल आयडी दिला आहे. तो कुठला आयडी आहे? त्यांना स्पेशल ई-मेल आयडी मिळाला आहे का? असे कामत म्हणाले.
न्यायालयाने मला निर्देश दिलेले नाहीत, मेरिटवर निर्णय घ्यायला सांगितलेय – राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी व्हीपच्या मुद्दय़ावर बोलताना शिवसेनेच्या वकिलांना सांगितले की, ‘मूळ याचिकेत तुम्ही व्हीप ई-मेलद्वारे बजावल्याचे म्हटलेले नाही. जर सर्व व्हीपच्या मुद्दय़ावर अवलंबून आहे तर तुम्ही हे आधीच याचिकेत का नाही जोडले? न्यायालयाने मला निर्देश दिलेले नाहीत, मला मेरिटवर निर्णय घ्यायला सांगितले आहे.’ शिवसेनेच्या व्हीपबाबतच्या पुराव्यांचा अर्जावर 21 नोव्हेंबर रोजी निर्णय घेऊ, असेही नार्वेकर म्हणाले.
विधिमंडळात नोंद असलेल्या अधिकृत मेल आयडीवरूनच व्हीप पाठवला
शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब आणि सुनील प्रभू हे या सुनावणीवेळी उपस्थित होते. सुनावणीनंतर अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुनावणीमध्ये झालेल्या युक्तिवादाबाबत त्यांनी माहिती दिली. अनिल देसाई यांनी सांगितले की, शिवसेनेचा व्हीप मिळाला नाही असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. मात्र शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी तो खोडून काढला. विधिमंडळात तसेच प्रत्येक पक्षाच्या कार्यालयात आमदारांच्या अधिकृत ई-मेल आयडी, पह्न नंबर याची नोंद असते. त्याच आयडीवरून व्हीप पाठवण्यात आले. त्याची सविस्तर माहितीही याचिकेत होती.
मिंधे गटाचा व्हीप घटनाबाह्य
शिंदे गटाकडून बजावण्यात आलेल्या व्हीपसंदर्भातही यावेळी युक्तिवाद झाला. यावेळी देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा दाखला देत शिंदे गटाचा व्हीप घटनाबाह्य असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदेंवर कायदेशीर कारवाई होऊ शकते
– व्हीप ज्यावरून मिळाला तो मेल आयडी आपलाच आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे व्हीप मिळाला नाही असे सांगणे गंभीर आहे. त्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे देवदत्त कामत म्हणाले.
– आयटी कायद्यानुसार ई-मेल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतो. शिंदेंबरोबरच्या सर्व आमदारांना व्हीप दिला गेला होता. ते नाकारत असतील तर त्यांनी ते ई-मेल आयडी त्यांचे नसल्याचे सांगावे आणि खरे आयडी कोणते ते सिद्ध करावे.
– शिंदेंच्या दाव्यानुसार, त्यांचा मेल आयडी त्यांच्या ताब्यात नाही. तसेच त्यांचा मेल फिशिंग झालेला असू शकतो, याशिवाय 21 जणांच्या ई–मेलवरही व्हीपचा मेल आला नाही असे ते सांगतात. त्याची खातरजमा आयटी तज्ञांकडून करता येईल.
– शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयाचे अधिकारी विजय जोशी यांच्या ई-मेलवरून शिंदे यांना व्हीप मेलवरून पाठवला होता, याकडे कामत यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले.


























































