उन्नाव बलात्कार प्रकरण: अखेर कुलदीप सिंह सेंगरची भाजपतून हकालपट्टी

236

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याची अखेर भाजपकडून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खासगी वृत्तवाहिन्यांनी यासंदर्भातील वृत्तप्रसारित केले आहे. मात्र पक्षाकडून याची माहिती किंवा यासंदर्भातील पत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा अपघात झाल्यानंतर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भाजपवर प्रचंड टीका होत होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याआधी त्याला केवळ पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या सुरक्षेवरून सर्वोच्च न्यायालयाने झापले आहे. सीबीआयने 7 दिवसांच्या आत तपास पूर्ण करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पीडितेच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचारांना देखील निलंबित करण्यात आले आहे. यासोबत उन्नाव बलत्कार प्रकरणातील सर्व खटले दिल्लीत चालवण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.

नोकरी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सेंगर याने 4 जून 2017 रोजी बलात्कार केल्याचा आरोप आहे. आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत पीडीत मुलीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अपदित्यनाथ यांच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या