फलटणमध्ये अजित पवार गटासह महायुतीला धक्का; संजीवराजे नाईक, आमदार दीपक चव्हाण यांनी ‘तुतारी’ फुंकली

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटासह महायुतीला आज फलटणमध्ये जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर, प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, अनिल देसाई आदी उपस्थित होते. सभेपूर्वी आमदार रामराजे निंबाळकर आणि शरद पवार यांची एकत्र बैठक झाली. मात्र, त्यानंतर रामराजे वगळता त्यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र योग्य व्यक्तींच्या हातात द्यायचा आहे म्हणून ही लढाई सुरू आहे. तुम्ही चिंता करू नका. काही झालं तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार म्हणाले, मी स्वतः निवडणुकीला उमेदवार नाही. मात्र, या सत्ताधाऱयांनी महाराष्ट्राची जी वाईट परिस्थिती केली आहे, ती काढून योग्य व्यक्तीकडे सत्ता देण्यासाठी आत्ताची लढाई आहे. राज्यकर्ते आया-बहिणींची काळजी घ्यायला खंबीर आणि गंभीर नाहीत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था नाही, असा हल्लाबोल करीत शरद पवार म्हणाले, राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे संरक्षण करता आले नाही. कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जोरदार वाऱयामुळे उद्ध्वस्त होतो. पुतळा उभारताना या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळेच सर्वसामान्य माणसांनी यांच्या हातातून सत्ता काढून घेणे गरजेचे झालेले आहे. माझं वय 84 झाले असले, तरी मी काही म्हातारा झालो नाही. मला खूप काम करायचे आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणसाला जोपर्यंत सन्मान मिळवून देत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. योग्य लोकांच्या हातात सत्ता देत नाही तोपर्यंत मलाही समाधान मिळणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

लोकसभेच्या दणक्यानंतर लाडक्या बहिणी आठवल्या!
शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे 2014 पासून पाच वर्षे राज्य होते. तेव्हा त्यांना बहीण दिसली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना सर्व समाज आणि लाडक्या बहिणी आठवल्या. राजकारण्यांपेक्षा लोक अधिक शहाणे आहेत. त्यांना कोणत्या वेळी काय करायचं ते सर्व कळतं. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता यावेळी योग्य तो निर्णय घेणार आहे, असेही ते म्हणाले.