
शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी व सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (15 रोजी) सुनावणी होणार असल्याची माहिती हरकतदार प्रवीण धसके यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. डॉ. शिंदे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्यांना अध्यक्षपद सोडावे लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.
‘डॉ. प्रिया शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रावर माझ्यासह संतोष साळुंखे व इतर तिघांनी हरकत घेतली होती. या हरकतीवर डॉ. शिंदे यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हरकतदारांची हरकत फेटाळण्याची मागणी नाकारत प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी प्रकरण दक्षता पथकाकडे वर्ग केले. या निर्णयाविरोधात डॉ. शिंदे यांनी 6 जुलै रोजी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून, त्यावर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे,’ असे प्रवीण धसके यांनी सांगितले.
‘जात पडताळणी समितीचा निर्णय कायदेशीर आणि पारदर्शक आहे. समितीसमोर त्यांनी माहिती अधिकारातून मिळवलेली कागदपत्रे आणि इतर पुरावे सादर केले असून, डॉ. शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या काही कागदपत्रांबाबत आक्षेप नोंदवले आहेत. सादर केलेले काही दस्तऐवज व वंशावळीबाबत शंका असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रिया शिंदे यांच्या माहेरच्या महसुली नोंदी आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे समितीसमोर वस्तुस्थिती स्पष्ट होईल. त्याचप्रमाणे अखेरीस जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास डॉ. प्रिया शिंदे यांना अध्यक्षपद सोडावे लागेल,’ असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर डॉ. प्रिया महेश शिंदे यांची भूमिका अद्यापि समोर आलेली नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, अंतिम निर्णय न्यायालय व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निष्कर्षानंतरच स्पष्ट होणार आहे.






























































